पुणे : दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाळप हंगामाला प्रारंभ करणार आहे. यंदा कारखाना प्रशासनाने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळप आणि १.२५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तब्बल चार वर्षांपासून बंद असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना निराणी ग्रुपने गेल्या गळीत हंगामात चालवायला घेतला. सर्व प्रक्रिया पार पाडत कारखान्याने तीन महिन्यांच्या कालावधीत ३ लाख १२ हजार २१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत २ लाख ८२ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी ११.६५ साखर उतारा मिळाला होता.
ऊस वाहतूक ट्रॅक्टर, सभासद, कामगार, शेतकरी तसेच कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची बिले वेळेत खात्यावर जमा करून भीमा पाटस कारखान्याने अल्पावधीत सर्व घटकांचा विश्वास संपादन केला आहे. यंदाही पुणे जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे.
निराणी ग्रुपचे यंदा गळीत हंगामाचे दुसरे वर्ष आहे. निराणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मृगेश निराणी, संगमेश निराणी, भीमा पाटस साखर कारखाना प्रशासन व कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांचा शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देण्याचा मानस आहे. यंदा कारखाना प्रतिदिनी १० हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे. डिस्टिलरी व कोजनरेशन प्रकल्पमध्येदेखील मोठी उभारी घेणार असून, या वर्षी दिवसाला ७० हजार लिटर इथेनॉल निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली.