शामली : यावर्षी उसाचे कमी उत्पादन आणि सहारनपूर जिल्ह्यात दोन नवीन साखर कारखाने सुरू झाल्यामुळे, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील साखर कारखान्यांना आगामी गळीत हंगामात ऊस टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. शामली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकर्यांना उसाचे पैसे न दिल्यामुळे सहारनपूर, मुझफ्फरनगर जिल्ह्यातील साखर कारखाने येथील कारखान्यांच्या खरेदी केंद्रांकडे डोळे लावून बसले आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांत उसाचे क्षेत्र घटत आहे असे ऊस विभागाकडील आकडेवारीनुसार दिसून येते. उसावरील किड-रोग हे उसाचे क्षेत्र कमी होण्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शाल्मली जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तीन ते पाच टक्क्यांनी घटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकवत आहेत. शामली, ठाणाभवन, ऊन साखर कारखान्यांनी उसाचे पैसे न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त आहेत. नवीन गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये आपला ऊस या कारखान्यांना देण्याऐवजी खतौली, तितावीसह अन्य जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
दरम्यान, शामली ऊस समिती कार्यालयात गेल्या सात दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र बदलून दुसऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना देण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी शामली ऊस समितीच्या ऊस संरक्षण बैठकीत शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस न देण्याचा निर्णय दिला आहे. सहारनपूर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद, बिडवी, शाकंभरी देवी या साखर कारखान्यांनाही उसाची गरज भासेल. उसाच्या टंचाईमुळे हंगामात संकट येणार आहे. खासगी साखर कारखान्यांना जादा दराने ऊस खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र पाच टक्क्यांनी घटले आहे. उसावर किड, रोगांचाही हल्ला झाला आहे. दुसरीकडे सहारनपूर जिल्ह्यातील वर्षानुवर्षे बंद बिडवी आणि शाकंभरी तोडरमल या साखर कारखान्यांना उसाची गरज भासेल.