बासमती तांदळावर १२०० प्रती टन किमान निर्यात मूल्य मर्यादा लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा कंपनीच्या बासमती निर्यातीवर परिणाम होणार नाही, असे एलटी फूड्स लिमिटेडने सोमवारी सांगितले. याबाबत, कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या निवेदनात दावा केला आहे की एलटी फूड्स लिमिटेडच्या निर्यातीवर किंमत मर्यादाचा परिणाम होणार नाही, कंपनी मुख्यतः दावत आणि रॉयल या प्रीमियम ब्रँड्स अंतर्गत निर्यात करते. निर्यात केल्या जाणाऱ्या तांदळाचे मूल्य किमान निर्यात किंमत मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्या गैर-बासमती तांदळाच्या संभाव्य बेकायदेशीर निर्यातीला आळा घालण्यासाठी सरकारने १२०० डॉलर प्रती टनापेक्षा कमी दराने बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी वाणिज्य मंत्रालयाने निवेदन जारी केले होते. व्यापार प्रोत्साहन संस्था अपेडाला १२०० डॉलर प्रती टनापेक्षा कमी कराराची नोंदणी न करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याचे १२०० डॉलर प्रती टनापेक्षा कमी दराचे करार स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बासमती तांदूळ निर्यातदार जीआरएम ओव्हरसीजचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गर्ग म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीची सरासरी किंमत ९०० ते १००० डॉलर प्रती टन आहे. त्यामुळे सरकारने बासमती तांदळाची किमान निर्यात दराची मर्यादा १२०० रुपये प्रती टनावरून कमी करावी अशी मागणी उद्योगांच्यावतीने करण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तर गेल्या महिन्यात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला बंदी घातली आहे.