पुणे / सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवाराने बंद असणारे कारखाने चालू करून ४ ही युनिट परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाचा प्रश्न सोडविला. तरुणांना रोजगार उपलब्ध करून परिसराचा कायापालट करण्याचे काम चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केल्याचे गौरवोद्गार राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढले.
ओंकार साखर कारखाना परिवाराच्या अद्यावत ऑफीसचे उद्घाटन डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पुलकुंडवार म्हणाले कि, राज्य आणि देशाच्या विकासात साखर उद्योगाने नेहमीच महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इथेनॉल उत्पादनाच्या माध्यमातून साखर उद्योग देशाला नवी देत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बोत्रे-पाटील म्हणाले, ओंकार साखर कारखान्याच्या सर्व चारही युनिट मधील अंतर्गत कामे अंतिम टप्यात आहेत. चांदापुरी (ता.माळशिरस) युनिट एक मधील विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून २०२३ २४ च्या हंगामात अदयावत कारखाना सुरू होणार आहे. ओंकार परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पाच हजार रोपांची लागवड करून संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, दादासाहेब बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, प्रशांत बोत्रे-पाटील, ओम बोत्रे-पाटील, डॉ. गोरी बोत्रे-पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना पदाधिकारी उपस्थित होते.