भारत करणार सिंगापूरला तांदूळ निर्यात, मित्रत्व निभावण्यासाठी निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या महिन्यात देशातील तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी
बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे भारताकडून तांदूळ निर्यात होणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. जागतिक स्तरावर तांदळाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, आता भारताने सिंगापूरला तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांतील मजबूत संबंध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात भारताने सर्व बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे तांदळाचे भाव १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

मनीकंट्रोल वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, सिंगापूरला तांदूळ निर्यात करण्यास परवानगी देणारा औपचारिक आदेश लवकरच जारी केला जाईल. भारत आणि सिंगापूर हे अत्यंत जवळचे भागीदार देश आहेत. त्यांच्यात समान, जवळचे आर्थिक संबंध व  हितसंबंध आहेत. हे विशेष संबंध लक्षात घेऊन सिंगापूरच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत अन्न सुरक्षेसाठी २० जुलैपासून बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काही जातींवर निर्बंध असूनही चालू वर्षात तांदूळ निर्यातीत वाढ होत असल्याचे सरकारने निरीक्षण नोंदवले. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. गेल्यावर्षी सिंगापूरच्या तांदूळ आयातीपैकी ४० टक्के भारताचा वाटा होता. यापूर्वी सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्सनेही पुन्हा तांदूळ निर्यात करण्याचे आवाहन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here