यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
औरंगाबाद : चीनीमंडी
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एनएसएल समूहाच्या जय महेश खाजगी साखर कारखान्याला टाळे ठोकण्यात आले आहे. गाळप झालेल्या उसाची एफआरपी न दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात जयमहेश साखर कारखान्याने ७ लाख टन उसाचे गाळप केले होते. पण, गाळप झालेल्या उसाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर होती. एफआरपीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र होके यांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. साखर आयुक्तालयाचे याकडे लक्ष वेधले होते. कारखान्याच्या गेटला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्याचा इशारा होके यांनी दिला होता. पुण्यातील साखर आयुक्तालयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदनही दिले होते. त्यानंतर साखर आयुक्तालयाने याची दखल घेतली आणि कारखान्याला नोटिस काढली होती. कारखान्याला ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची कायदेशीर तरतूद असतानाही खात्यांवर पैसे जमा झाले नसल्याचे होके यांनी म्हटले होते.
यानंतर साखर आयुक्तलयाने सूचना केल्याने जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रतिभा गोरे यांनी मंगळवारी कारखान्याला टाळे ठोकले. मिळालेल्या आकडेवारीनुसार, जय महेश साखर कारखान्याची ३० जानेवारीपर्यंत सुमारे चार कोटी रुपये ऊस बिल थकबाकी आहे.