साखर कारखान्यांना सुटे भाग पुरवणारी ‘आजरी इंजिनीअरिंग’ आता इस्रोच्या अंतराळ मोहिमांना करणार मदत

कोल्हापूर :

गेल्या ४६ वर्षांपासून साखर कारखान्यांना सुटे भाग पुरवून देशाच्या साखर उद्योगात महत्वपूर्ण योगदान देणारी आजरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. आता इस्रोच्या अंतराळ मोहिमांना आवश्यक सुटे भाग पुरवत आहे. बेंगळुरू स्थित आजरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि., ISRO च्या अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने 28 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या यु. आर. राव केंद्राला उपग्रहासाठी आवश्यक असणाऱ्या “स्पेस-क्वालिफाईड हीट पाईप्स” (Space – qualified heat pipes) ची पहिली तुकडी सुपूर्द केली.

देशाच्या प्रगतीत योगदान देत असल्याचे समाधान: बसवराज आजरी

आजरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक बसवराज आजरी ‘चीनी मंडी’ शी बोलताना म्हणाले की, इस्रोशी सहकार्य हा आजरी उद्योग समूहाच्या आजपर्यंतच्या वाटचालीतील मैलाचा दगड आहे. हिट पाईप निर्मितीची प्रक्रिया क्लिष्ट व गुंतागुंतीची असल्याने कंपनीला हिटपाईप तयार करण्यासाठी तब्बल 5 वर्षे लागली. हिट पाईप हा एक घटक उपग्रहातील पॅनेलच्या उष्णता व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. उपग्रहातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे तयार झालेली अतिरिक्त उष्णता शोषून घेते. जेव्हा यान अवकाशात प्रवेश करते, तेव्हा अवकाशातील थंड प्रदेशातील तापमानही नियंत्रित करते. जगभरात उच्च गुणवत्तेच्या हिटपाईपची निर्मिती करणारे फक्त सहा उत्पादक आहेत. त्यातील भारतात फक्त दोन उत्पादक आहेत. यामध्ये ‘आजरी इंजिनिअरिंग’चा समावेश आहे.

इस्रोने मान्यता दिलेली देशातील दुसरी कंपनी…

‘इस्रो’ने आगामी अंतराळ मोहिमांसाठी हिट पाईपची पूर्तता करण्यासाठी नवीन उत्पादक विकास योजना आखली आहे. यामध्ये आजरी इंजिनिअरिंग भारतातील दुसरा उत्पादक बनला आहे, ज्याला इस्रोने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर भारत हा जगाला अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक दर्जेदार हिट पाईप पुरवठा करणारा चौथा देश बनला. ‘इस्रो’ने त्यांच्या देखरेखीखाली बंगळूर येथे आजरी इंजिनिअरिंगने उत्पादन सुरू केले आहे. ‘इस्रो’ला आगामी काळात स्वत:च्या आणि इतर देशांच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हिट पाईप आवश्यक असणार आहेत. ही हिट पाईप युरोपियन देशात तयार होणाऱ्या हिट पाईपपेक्षा स्वस्त असेल. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड हा या प्रकल्पातील कंपनीचा भागीदार आहे आणि त्यांनी आजरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 5.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या उत्पादनांची जिगानी येथील चाचणी केंद्रात कठोर चाचणी घेतली जाते.

चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी इस्रोच्या टीमचा केला सन्मान…

चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमचा आजरी इंडस्ट्रीजने सन्मान आला. URSC-ISRO कडून आलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये संचालक एम. शंकरन, सहयोगी संचालक डॉ. आलोक कुमार श्रीवास्तव, नियंत्रक श्रीमती अंजली एलिस शंकर, संचालक LEOS डॉ. श्रीराम केव्ही, उपसंचालक सुरेश कुमार एच.एन., उपसंचालक बसवराज एस. राजेंद्र ए., गट संचालक, अक्कीमराडी, आणि CBPO-ISRO मुख्यालय, संचालक सुधीर कुमार एन. यांचा कोल्हापुरी भगवा फेटा, अंबाबाईची मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संचालक अनिश मेहता हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांचा सन्मान केल्यानंतर बोलताना बसवराज आजरी म्हणाले, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम रोव्हर प्रथमच बसवून आपल्या देशाचे नाव अंतराळ इतिहासात कायमचे कोरले गेले आहे. इतर कोणत्याही देशाने ही कामगिरी केलेली नाही. चांद्रयान 3 मोहिमेचे संपूर्ण श्रेय इस्रो आणि त्याच्या समर्पित टीम सदस्यांना जाते.

कोल्हापूरचा झेंडा देशभर फडकला…

आजरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज हा ISRO ला हीट पाईप्सचा पुरवठा करणारा भारतातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार बनला असून गुणवत्तेच्या बाबतीत देशातील नंबर एक पुरवठादार बनण्याचा मान कंपनीला मिळाला आहे. आजरी इंडस्ट्रीजच्या या कामगिरीच्या माध्यमातून कोल्हापूर औद्योगिक क्षेत्राने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात दमदार पाऊल टाकत संपूर्ण देशात आणि जगात पुन्हा एकदा कोल्हापूरचा झेंडा फडकवला आहे. आजरी इंडस्ट्रीजला आता जगभरात हिट पाईप्स निर्यात करण्याची संधी मिळणार आहे आणि हिट पाईप्स निर्यात करणारा भारत जगातील चौथा सर्वात मोठा निर्यातदार देश बनेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here