नवी दिल्ली : संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी केंद्र सरकार 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे ‘विशेष अधिवेशन’ घेणार असल्याची घोषणा केली. हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. मंत्री जोशी यांच्या या घोषणेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, यावर विरोधी पक्षांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
संसदेचे विशेष अधिवेशन (17व्या लोकसभेचे 13वे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन) 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. मंत्री जोशी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे कि, अमृत काळात संसदेत अर्थपूर्ण चर्चेची अपेक्षा आहे. तथापि, मंत्री जोशी यांनी अधिवेशन का बोलावले आहे हे सांगितले नाही.
संसदेचे मागील, पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी I.N.D.I.A (भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. प्रामुख्याने मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा गाजला होता. विशेष अधिवेशनाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.