सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात व सोलापूर जिल्हात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अभिजित पाटील यांनी महसूल तथा पालकमंत्री विखे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. लोकांना आतापासूनच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुपालकांना जनावरांना चारा देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी शेतातील पिके उध्वस्त झाली आहेत. पाण्याविना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पाटील यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे कि, मी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्याचा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शासनाच्या वतीने पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची नितांत गरज आहे. याबाबतचे आदेश शासनस्तरावरून संबंधित विभागाला द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की, दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. चारा छावण्या सुरु केल्यास जनावरांचे हाल होणार नाहीत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.