भारतीय अर्थव्यवस्थेला महिन्याच्या पहिल्या दिवशी बुस्ट मिळाले आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने २०२३ साठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. एक दिवसापूर्वी सरकारने पहिल्या तिमाहीसाठी अधिकृत जीडीपी डेटा जारी केला होता. त्यानुसार भारताचा विकास दर इतर कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने शुक्रवारी ग्लोबल मायक्रो आउटलूक जाहीर केले. यामध्ये भारताबाबत आपले अनुमान वर्तवले आहे. मुडीजच्या म्हणण्यानुसार, वर्ष २०२३ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर ६.७ टक्के राहिल. यापूर्वी मुडीजने भारताच्या आर्थिक वाढीचा दर ५.५ टक्के राहिल असे म्हटले होते.
एनएसओने गुरुवारी पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर केले होते. एनएसओच्या डेटानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत वार्षिक ७.८ टक्के वाढ नोंदवली आहे. हा आकडा रिझव्र्ह बँकेच्या पहिल्या तिमाहीत ८ टक्के विकास दराच्या अंदाजापेक्षा कमी आहे. परंतु सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे.
मूडीजने सांगितले की, सेवा क्षेत्राचा मजबूत विस्तार आणि भांडवली खर्चामुळे एप्रिल ते जून या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत झाली आहे. मात्र, मूडीजने पुढील वर्षभराबाबत भीतीही व्यक्त केली आहे. मूडीजचे म्हणणे आहे की, दुसऱ्या तिमाहीने उच्च आधार निर्माण केला असल्याने हे वर्ष चांगले जात आहे. मात्र, २०२४ मध्ये भारताचा विकास दराचे अनुमान ६.5 टक्क्यांवरून ६.१ टक्क्यांपर्यंत कमी येईल.