पानिपत (हरियाणा) : चीनीमंडी
राष्ट्रीय हरीत लवादाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी पानिपत सहकारी साखर कारखान्याला दहालाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना १० लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे दंड स्वरूपात भरण्याचे आदेश दिले आहेत.
कारखान्यातील राख हवेत सोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादाना पानिपत सहकारी साखर कारखान्याला १२ डिसेंबर २०१८ रोजी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच कारखान्याविरोधात वेळेत कारवाई न केल्याबद्दल हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पाच लाख रुपयांचा दंड केला होता.
या संदभातील संजय कॉलनीतील अमित कौशिक यांनी राष्ट्रीय हरीत लवादाकडे तक्रार दाखल केली होती. हवेत राख सोडल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागल्याचे तक्रारीत म्हटले होते. तसेच परिसरातील पिकांवरही त्याचा परिणाम दिसत आहे.
या संदर्भात हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाने परिसरातील काही सॅम्पल्स गोळा केले होते. त्यानंतर कारखान्याला १८ ऑक्टोबर रोजी नोटिस पाठविण्यात आली होती. साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण केल्यानंतर ९ नोव्हेंबरला ही नोटिस रद्द करण्यात आली होती. पण, लवादाच्या दंडाची २५ लाख रुपयांची रक्कम कमी करावी, अशी याचिका साखर कारखाना व्यवस्थापनाने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.