‘ओंकार’ साखर उद्योगातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा समूह : बाबुराव बोत्रे – पाटील

अहमदनगर : ओंकार समुहाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती आणण्याबरोबरच शेको तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात यश मिळवले आहे. ओंकार हा साखर उद्योगातील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा समूह बनला आहे. हिरडगाव येथील गौरी शुगरचा यंदा होणारा पहिलाच गाळप हंगाम असून उसाला एक नंबर भाव देणार आहे, असे ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे – पाटील यांनी सांगितले.

हिरडगाव येथे गौरी शुगरचा रोलर पुजन समारंभ शुक्रवारी (दि. १) बाबुराव बोत्रे-पाटील व रेखा बोत्रे-पाटील यांच्या हस्ते, तर २४० केपीएलडी क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे भूमिपूजन प्रशांत बोत्रे-पाटील व शारदा बोत्रे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबुराव बोत्रे – पाटील बोलत होते. ते म्हणाले, आ. बबनराव पाचपुते यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आधुनिक प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी १२ वर्षांचे तप केले. साखर निर्मिती करून ऊसाला भाव देता येणार नाही.

ते म्हणाले, व्यवसाय व व्यवहार डोळ्यासमोर ठेवून डिस्टीलरी क्षमता २४० केपीएलडीने वाढविणार आहे. त्यामुळे दररोज तीन लाख लिटर इथेनॉल निर्माण होणार आहे. २४ टीपीएच क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प तयार करण्यात येईल. प्रेसमडपासून दररोज ४०० मेट्रिक टन पोटॅश तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते व आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत सहा महिन्यांत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक रोहिदास यादव म्हणाले, बाबुराव बोत्रे-पाटील यांनी गौरी शुगरच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १५ ऑक्टोबरला कारखाना सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. यावेळी मिलिंद दरेकर, उस्मानाबाद येथील लक्ष्मी शुगरच्या चेअरमन स्मिता पाटील, गणेशराव डोईफोडे, संपतराव दरेकर, संतोष दरेकर, गंगाराम दरेकर, दिनेश दरेकर उपस्थित होते. नवनाथ देवकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरी शुगरच्या चेअरमन गौरी बोत्रे-पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here