मुझफ्फरनगर : बजाज शुगर मिलकडे शेतकऱ्यांची २२० कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. गेल्या ९० दिवसांपासून शेतकरी बिलांसाठी कारखान्याच्या गेटवर बेमुदत आंदोलन करीत आहेत. शनिवारी कारखाना आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यासमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस बिल देण्यास वीस दिवसांची मुदत दिली.
भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी उसाची थकबाकी न दिल्यास कारखान्याला टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना उसाची थकबाकी २० दिवसांत न दिल्यास शेतकरी आपला ऊस बजाज शुगर मिलला देणार नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बील देणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, थकीत बिलापोटी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढतील आणि ऊस जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जातील, असा इशाराही टिकैत यांनी दिला.