तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

अहमदनगर : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अखेर भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

तनपुरे साखर कारखान्याच्या थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेतर्फे सरफेसी ॲक्टनुसार २ सप्टेंबर २०१४ रोजी कारखान्याची सर्व चल व अचल तारण मिळकत जप्तीची कारवाई करण्यात आली. शासनातर्फे कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. कारखान्यावर दोन वर्षे प्रशासकराज होते. २०१६ साली कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यात, विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळ सत्तेवर आले.

दरम्यान, सलग तीन वर्षे कारखाना बंद पडला. डॉ. सुजय विखे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सहकार्याने बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन केले. बँकेने जप्त किलेला कारखाना संचालक मंडळातर्फे चालविण्यासाठी ताब्यात घेतला. कोरोना काळात संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली. परिवर्तन मंडळाच्या सात वर्षाच्या काळात चार वर्षे कारखान्याचा ऊस गाळप हंगाम घेण्यात आला. संचालक मंडळाला मुदतवाढ संपल्याने कारखान्यावर पुन्हा शासनातर्फे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here