सांगली : ऊसतोड करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी २३ लाख ५ हजार रुपयांची रक्कम घेऊन शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कडेगाव तालुक्यातील वांगी येथे घडली आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पाराव हणमंत कुटकर (रा. नांदलापूर, ता. कराड, सध्या रा. गौडगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), विजय अशोक चव्हाण (रा. सांडवा, ता. पुसद, जि. यवतमाळ), संतोष भारत राठोड (रा. सेवादासनगर, ता. पुसद), जेताराम देवसिंग जाधव (रा. जुनोना, ता. पुसद), दशरथ शामराव राठोड आणि नितीन दीपक राठोड (दोघेहीरा. देवकाली, ता. पुसद) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आप्पासाहेब दत्तात्रय एडके (रा. वांगी, ता. कडेगाव) यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अप्पासाहेब एडके यांची वांगी येथे शेती आहे. २०२३ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी संशयितांनी एकडे यांच्याशी करार केला होता. धाराशिव जिल्ह्यातील पुसद येथे तशी नोटरी करण्यात आली होती. त्यामध्ये ७२ मजूर पुरविण्याचे ठरले होते. त्यामुळे एडके यांनी संशयितांना २३ लाख ५ हजार रुपये दिले. हा प्रकार १७ ऑगस्ट २०२१ ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला. पण या व्यवहारात एडके यांची फसवणूक झाल्याने त्यांनी तक्रार दिली आहे.