बीड : राज्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोठे प्रकल्प, साठवण तलाव यामध्ये पाणीसाठा अत्यंत कमी आहे. विहिरी, बोरवेल, यांची पाणीपातळी खालावली आहे. ऊस पीक वाळून जात आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करावा, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी म्हटले आहे कि, प्रकल्प व तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने व सदर भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने पाण्याअभावी ऊस करपू आहे. उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. नोव्हेंबर किंवा दिवाळी नंतर साखर कारखाने सुरु केल्यास तोडणी यंत्रणा येण्यास २० ते २५ दिवसाचा कालावधी लागतो. तोपर्यंत पाण्याअभावी उसाचे चिपाडे होऊन शेतकऱ्यांच्या ऊसाचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे चालू हंगामात साखर कारखाने १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु करून ऊस गाळप करणे अत्यंत गरजेचे आहे. साखर कारखान्यांना १ ऑक्टोबर २०२३ पासून गाळप हंगाम सुरु करण्याबाबत आदेश देण्याची मागणी आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.