अगस्ती कारखान्याचे साडेचार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन सीताराम गायकर

अहमदनगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात बाहेरील (गेटकेनचा) अडिच लाख मेट्रिक टन व कार्यक्षेत्रातील २ लाख मेट्रीक टन असा एकूण साडेचार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निर्धारित केल्याची माहिती अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर यांनी दिली.

अकोले तालुक्यातील अगस्तीनगर येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर गायकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. या सभेत अगस्तीचे अध्यक्ष सीताराम गायकर यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्त करावी, अशी सूचना सभासद प्रकाश महाले यांनी केली. त्यास रावसाहेब भोर यांनी अनुमोदन दिले. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

यावेळी गायकर म्हणाले की, कारखाना अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करू. अगस्ती कारखान्यावर सद्या १६५ कोटी कर्ज आहे. पुढील तीन वर्षात इथेनॉल प्रकल्प कर्जमुक्त होईल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांचेही भाषण झाले.

याप्रसंगी आ. डॉ. किरण लहामटे, व्हा. चेअरमन सुनिता भांगरे, मधुकर नवले, उत्कर्षा रुपवते, युवा नेते अमित भांगरे, विठठल चासकर, बी.जे. देशमुख, गिरजा जाधव, प्रकाश मालुंजकर, जि.प. सदस्य जालिंदर वाकचौरे, मधुकरराव तळपाडे, मार्केटचे चेअरमन भानुदास तिकांडे, भाऊ नवले, डॉ. मनोज मोरे, महेश नवले, सोन्याबापु वाकचौरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here