मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून साखरेच्या १२३ पोत्यांची चोरी

अहमदनगर : नगर-दौंड कॉर्डलाईन रेल्वे मार्गावर सारोळा कासार (ता. नगर) रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून चोरट्यांनी साखरेची तब्बल १२३ पोती लंपास केली. चोरलेली साखरेची पोती चोरट्यांनी रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतातील मका पिकात लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे मालगाडीचा एक डबा चोरट्यांनी फोडून साखरेची पोती चोरून नेल्याचे निदर्शनास आले होते. गस्तीवरील हेड कॉनटेबल बापू घोडके आणि सुनील मराठे यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. नगर व दौंड येथून लोहमार्ग पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. शोधाशोध करत असताना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे मार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वे परिसराबाहेरील असलेल्या शेतात साखरेची पोती काळ्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेल्या स्थितीत आढळून आली. पोत्यांवर कृष्णा शुगर, चितळी, जिल्हा बेळगाव असा शिक्का आहे. ही पोती शेतात कोणी आणून ठेवली, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here