काठमांडू : साखर उद्योगातील मध्यस्थांनी घाऊक दरात वाढ केल्यामुळे काठमांडूमध्ये साखरेचा किरकोळ विक्री दर ११० रुपये (NPR) प्रती किलो झाला आहे.
नेपाळी प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने ही दरवाढ झाली आहे. त्याचा सर्वाधिक भार सर्वसामान्यांवर पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी हे दलाल सणासुदीच्या काळात विविध कारणांनी साखरेची दरवाढ करण्याचा प्रयत्न करतात. दलालांनी आता दशई सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर प्रती किलो १२५ रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी चालवली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदू शंकर साखर कारखाना, रिलायन्स शुगर मिल, एव्हरेस्ट साखर कारखाना, हिमालय साखर कारखाना आणि ईस्टर्न साखर कारखान्यासह अनेक साखर कारखान्यांकडे ऑगस्टच्या मध्यापर्यंत साखरेचा पुरेसा साठा होता. मात्र, मध्यस्तांनी ते ९७ रुपये प्रती किलो दराने विकत घेतली. त्यानंतर तीच साखर घाऊक बाजारात १०५ ते १०७ रुपये किलो दराने विकली जात आहे.
दरम्यान, यंदाच्या सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा भासण्याचा इशारा खासगी क्षेत्राने दिला आहे. सरकारने साखर आयातीची सोय केली नाही तर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून बाजाराला मोठी दरवाढ होण्यासह साखरेचा तुटवडा जाणवण्याची खात्री आहे. डिसेंबरपर्यंत ठराविक प्रमाणात साखरेचा पुरवठा करण्यासाठी सरकारने भारतासोबत धोरणात्मक चर्चेस पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासगी क्षेत्राने केले आहे.