‘एफआरपी’बरोबरच साखरेची ‘एमएसपी’ वाढवून द्यावी : आमदार बबनदादा शिंदे

सोलापूर : केंद्र सरकारने उसाची ‘एफआरपी’ किंमत वाढवताना साखरेची ‘एमएसपी’ही वाढवून द्यावी. त्याचबरोबर इथेनॉलला प्रति लिटर पाच रुपये वाढवून मिळाल्यास खऱ्या अर्थाने साखर उद्योग आणि शेतकऱ्यांची प्रगती होईल,असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बबनदादा शिंदे यांनी केले.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आमदार शिंदे म्हणाले, दिवाळी निमित्त कारखान्याच्या कामगारांना दोन महिन्यांचा बोनस पगार देण्यात येणार आहे. २०२३ -२०२४ गळीत हंगामात पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन मधून २८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट्य आहे. कार्यक्षेत्रातील उसाच्या उपलब्धतेनुसार विठ्ठलराव शिंदे कारखान्याची गाळप क्षमता ११ हजार मेट्रिक टनापर्यंत विस्तारित केली आहे.मागील हंगामात शेतकऱ्यांना २,६५० रुपये एफआरपी व ५० रुपये अधिक असे एकूण प्रति टनास २,७०० रुपये दर दिलेला आहे.

पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोनसाठी पुढील हंगामात ५० हजार हेक्टर उसाच्या नोंदी उपलब्ध आहेत. पुढील हंगामात प्रतिटनाला २,४५० रुपये पहिले ऊस बील देण्यात येईल. यंदाच्या हंगामातही प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या उसाचे पैसे खात्यावर जमा केले जातील, असेही आ. शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे,कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे, जनरल मॅनेजर सुहास यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी रमेश येवले-पाटील, प्रभाकर कुटे, पोपटराव चव्हाण, पोपटराव गायकवाड, अमोल चव्हाण, नीलकंठ पाटील, विष्णू हुंबे, लक्ष्मण खुपसे, वेताळा जाधव, सचिन देशमुख, बापू डोके, संदीपान पाटील, पांडुरंग घाडगे, अनिल वीर, बंडूनाना ढवळे, दिलीप भोसले आदी उपस्थित होते. संतोष डिग्रजे यांनी अहवाल वाचन केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुरेश बागल यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here