सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे एकरी सरासरी उत्पादन केवळ २८ टन होते. मात्र आ. जयंत पाटील यांच्या ‘लक्ष्य एकरी १०० टनांचे’ उपक्रमामुळे ते ४५ टनांपर्यंत पोहोचले आहे. ठिबक सिंचनसह नवीन तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन ५५ ते ६० टनांपर्यंत नेण्याचा मानस आहे, असे मत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
वाघवाडी फाटा येथे राजारामबापू कारखान्यातर्फे ‘ऊस उत्पादन लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान व भरघोस उत्पादन वाढीसाठी ठिबक तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. पाटील म्हणाले, गाळप हंगामासाठीची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. यावेळी ‘व्हीएसआय’चे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी ‘आधुनिक शेती’ विषयावर माहिती दिली.
सचिन पाटील यांनी ठिबक सिंचनाची माहिती दिली. आनंद गुळदगड यांनी स्वागत केले. यावेळी देवराज पाटील, रणजित पाटील, संचालक शैलेश पाटील, प्रताप पाटील, संग्राम जाधव, प्रशांत पाटील, सुजय पाटील, संजय शिंदे उपस्थित होते. सुरेश मगदूम यांनी आभार मानले.