कोल्हापूर : भोगावती कारखान्याने नियमानुसारच साखर विक्री केली आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी लोक कारखान्याची बदनामी करत आहेत. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर, कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी दिली.पाटील- कौलवकर म्हणाले की, कारखान्यातीलच काही कर्मचारी कारखान्याच्या बदनामीकारक माहिती बाहेर पुरवित आहेत. त्याची शहानिशा करून संबधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
भोगावती कारखान्याची साखर परस्पर विकली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी केला होता. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर म्हणाले की, निवडणुकीच्या मैदानात आरोप करा, त्याची आम्ही उत्तरे देऊ, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, हुकूमशाही पद्धतीने कारखान्यात घुसून खोटी माहिती घेणे शोभत नाही. यावेळी संचालक हिंदुराव चौगले, धीरज डोंगळे, ए. डी. पाटील, संजयसिंह पाटील, ए. डी. चौगले, रवी पाटील आदी उपस्थित होते.