देशातील इंधन आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी, पाचटापासून (शेतात उरलेले पिकाचे अतिरिक्त अवशेष) इंधन तयार केले जात आहे. आगामी काळात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पाचटापासून उत्पादित इंधनाचा काही वर्षात व्यावसायिक विमाने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरमध्ये वापर केला जाईल असे ते म्हणाले.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत झालेल्या एसीएमएच्या ६३ व्या वार्षिक अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशात आता पाचट जाळले जात नाही. पानिपतमध्ये इंडियन ऑइलचा प्लांट सुरू झाला आहे. येथे भाताचा पेंढा व इतर पिकाच्या अवशेषांपासून एक लाख लिटर इथेनॉल बनवले जाते आणि १५० टन बायो बिटुमेन बनवले जाते. हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये २२ टक्के इथेनॉल वापरले जात आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, आगामी काळात विमान इंधनात ८ टक्के बायो एव्हिएशन फ्युएल वापरण्याची योजना आहे. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा ३ ते ४ वर्षांत व्यावसायिक विमाने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर धावतील, असा दावा त्यांनी केला.
गडकरी म्हणाले की, सध्या देशाची इंधन आयात १६ लाख कोटी रुपयांची आहे. आगामी पाच वर्षांत ती २५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल. वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मी मंत्री होण्यापूर्वी हा उद्योग साडेचार लाख कोटींचा होता आणि आज तो १२.५ लाख कोटींचा उद्योग झाला आहे. भारत स्वावलंबी होत आहे, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपण एकेकाळी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर होतो. आता जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. विशेष म्हणजे डिझेलची गरज कमी करण्यासाठी आणि देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पाचटासून जैवइंधन तयार करण्यासाठी एक हजार प्लांट्स उभारण्याची योजना असल्याचे गडकरी यांनी सांगितले.