पुणे : कर्मयोगी साखर कारखाना अडचणीतून बाहेर आणला असून शेतकरी, सभासदांच्या विकासात यापुढेही मोलाचे योगदान देईल. कारखान्यातर्फे लवकरच उसाचा दुसरा हप्ता दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. बिजवडी येथे कर्मयोगी कारखान्याच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला फॅक्चर झाल्याने आजच्या सभेला ते उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी जखमी असतानाही व्हीलचेअरवर सभास्थळी उपस्थिती लावली.
यावेळी ‘कर्मयोगीं’च्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन हर्षवर्धन पाटील, त्यांच्या पत्नी भाग्यश्री व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच दुसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आगामी गळीत हंगामात उसाला काटा पेमेंट देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून महाराष्ट्रातील अडचणीतील सहकारी कारखान्यांना ८ टक्के दराने ६०० कोटी रुपयाचे कर्ज १० वर्षे परतफेडीनुसार कोणत्याही मालमत्ता तारण न देता मंजूर करून आणले. कारखान्यातील कामगारांचा सहा महिने थकीत पगार देखील दिला असून, वाहन व्यवस्था, मशिनरी व इतर व्यवस्थापन देखील गाळपासाठी लवकरच सज्ज होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कर्मयोगी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, शरद काळे, राहुल जाधव, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, उपाध्यक्ष सत्यशील पाटील, विलास वाघमोडे, मास्ती वनवे, भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, बाळासाहेब पाटील, कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, शांतिलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगनराव भोंगळे, हनुमंत जाधव, रतन देवकर, प्रवीण देवकर, भूषण काळे, पराग जाधव, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.
सरकारच्या अभिनंदनाचा ठराव
कर्मयोगी कारखान्याला एनसीडीसी १५० कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव सभासद वैभव गोळे यांनी मांडला. त्यास सुभाष भोसले यांनी अनुमोदन देत ठराव मंजूर केला.