सातारा : सध्या साखरेचे भाव ३५ ते ३६ रुपयांच्या पुढे आहेत. कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती यासारखे अधिक उत्पन्न देणारे उपपदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये देता येणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची रिकव्हरी ११.८१ असताना कारखान्याने मागील वर्षाच्या उसाला प्रति टन ३४११ रुपये दर दिला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनीही उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, कारखाना व्यवस्थापन चांगले असेल तर रिकव्हरी कमी असली तरी कारखाने एफआरपीपेक्षा जास्तीचा दर देऊ शकतात हे माळेगाव व सोमेश्वर या कारखान्यांनी दाखवून दिले आहे. माळेगाव कारखान्याची रिकव्हरी ११.८१ व सोमेश्वर कारखान्याची रिकवरी ११.९१ असताना दोन्ही कारखान्यांनी ३३५० व ३४११ एवढा उसाला भाव दिलेला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये कारखान्याच्या रिकव्हरी बाराच्या पुढे आहे. त्यांना आणखी पाचशे रुपये उसाला देणे सहज शक्य आहे.