पुणे : निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरील आर्थिक संकट दूर झाले असून आगामी काळात निरा-भीमाचा समावेश राज्यातील टॉप १० कारखान्यांमध्ये निश्चितपणे होईल, असा विश्वास कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन हर्षवर्धन पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कारखान्याकडून ऊसबिलाचा दुसरा हप्ता लवकरच अदा केला जाईल. कारखान्याचे भांडवल ६ कोटी एवढे असताना कारखान्याची मालमत्ता ३५२ कोटींची झाली आहे. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची प्रतिदिनी ३० हजार लिटर क्षमता वाढून १ लाख ५ हजार लिटर होणार आहे. कर्मचा-यांचा ऑगस्ट २३ पर्यंतचा पगार झाला आहे. दिवाळीला बोनस दिला जाईल. कारखाना आगामी गळीत हंगामात काटा पेमेंट करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. या सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, तानाजीराव होंगे, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील, किरण पाटील, दतू सवासे, हरिदास घोगरे, दादासोा घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.