मेरठ : पेपळा-इद्रिशपूर गावात गुरुवारी शेतकऱ्यांसाठी शरद ऋतूतील उसाची लागवड या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मुजफ्फरनगर येथील ऊस संशोधन केंद्रातून आलेल्या ऊस तज्ज्ञांनी लागवडीबाबतच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुजफ्फरनगर ऊस संशोधन केंद्रातील प्रशिक्षक रामबरन सिंग आणि शास्त्रज्ञ डॉ. अजय कुमार सिंग यांनी शरद ऋतूतील उसाच्या लागवडीबाबत जनजागृती केली. ते म्हणाले की, सध्या शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी युरिया आणि डीएपीचा अती प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. त्यासाठी माती परिक्षणावर भर देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या चारही कोपऱ्यांतून मातीचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत मोफत चाचणी करून घ्यावी. त्यानुसार पिक, खतांचा वापर या गोष्टी ठरवता येतात, असे त्यांनी सांगितले.
मालियाना ऊस समितीचे उपाध्यक्ष जगदीप गुप्ता यांनी ऊस विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. उसाची शरद ऋतूतील लागवड १५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात करावी. त्यातून जादा उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या ऊसाची पावती ऊस समितीमधून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. गिरीराज सिंह हे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नवीन सांगवान यांनी सूत्रसंचालन केले.