पुणे : राज्याचे माजी साखर आयुक्त, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेला ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ हा ग्रंथ साखर उद्योगाची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.खा. पवार म्हणाले, साखर उद्योगात माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी अनेक वर्ष काम केले आहे. साखर उद्योगाला दिशादर्शक ठरणारा ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे. साखर अभ्यासकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, अशी अपेक्षा खा. पवार यांनी व्यक्त केली.
मांजरी येथील ‘व्हीएसआय’च्या कार्यालयात शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे – पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर सह संचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ साखर उद्योगाची भरारी या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले.ऊस आणि साखर उद्योगाचा पाच हजार वर्षांपासूनचा इतिहास शब्दबद्ध करणारे हे पुस्तक आहे. साखरेची उत्पत्ती आणि इतिहास, जागतिक साखर उद्योग, भारतीय साखर उद्योग, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, ऊस व साखरेचे उपपदार्थ आदी विषयांची सविस्तर मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे मत मंत्री वळसे –पाटील यांनी व्यक्त केले.