मुरादाबाद : कंठ येथील सहकारी ऊस विकास समितीतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समिती स्तरावर तोडणी पावत्यांचे सादरीकरण, सर्व्हेचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले. शेतकऱ्यांनी नव्या प्रजातीच्या उसाची लागवड करावी असे आवाहन आमदारांनी यावेळी केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकारी ऊस विकास समितीच्या प्रांगणात बदापूरचे आमदार कुंवर सुशांत सिंह यांनी फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत हा मेळावा दररोज चालणार असल्याचे सहकारी ऊस सोसायटीचे सचिव मुकेशकुमार सक्सेना यांनी सांगितले. उसाबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास ते या मेळाव्याच्या माध्यमातून दुरुस्त करू शकतात असे सांगण्यात आले.
यावेळी स्योहारा साखर कारखाना, दिवाण साखर कारखाना, त्रिवेणी शुगर मिलचे अधिकारी उपस्थित होते. दिवाण साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक म्हणाले की, यावर्षी उसावर अनेक रोग असल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या ऊसाची लागवड करावी. कोणत्याही शेतकऱ्याने ०२३८ जातीच्या उसाची लागवड करू नये. जिल्हा ऊस अधिकारी रामकिशन यांनी सांगितले की, शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार काम केले जाईल. यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची विशेष काळजी घ्यावी. उसाच्या नवीन प्रजाती लावा असे आमदारांनी सांगितले. या मेळाव्यात अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी सूचना त्यांनी केली.