सांगली : राज्यातील ऊस बाहेरील राज्यात घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऊस निर्यात बंदीचा आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी याबाबत आम्ही कर्नाटकामध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ. बघू आम्हाला कोण अडवतंय, अशा शब्दात सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
‘एबीपी लाईव्ह’मधील वृत्तानुसार माजी मंत्री खोत म्हणाले की, येत्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना उसाच्या कांड्याला सोन्याचा भाव मिळणार आहे. परंतु, राज्य सरकारला शेतकऱ्याचा ऊस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे, असे हे निर्णय पाहिल्यावर वाटते. शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले की सरकारच्या पोटात दुखायला लागते, अशी टीकाही खोत यांनी केली. .
माजी मंत्री खोत म्हणाले की, हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा ही विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही करीत आहोत. अन्यथा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामामध्ये रस्त्यावर उतरेल. शिवाय, आम्ही कर्नाटकामध्ये वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ. बघू आम्हाला कोण अडवतेय ते. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालय हे ऊस उत्पादकांना लुटण्याचं कोठार आहे. आम्हाला लुटणार असाल, तर साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू असा इशारा त्यांनी दिला.
सदाभाऊ खोत म्हणाले की, कर्नाटकामध्ये शेतकऱ्याला ऊस घालण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालयाने मनाई केली आहे. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. आम्ही कष्ट करून पिकवलेला ऊस राज्यातील साखर कारखान्याला द्यावा की, कर्नाटकाला द्यावा की, गुजरातला द्यावा याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. दोन पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागलं की सरकारच्या पोटात दुखायला लागते, असा टोला त्यांनी लगावला.