पुणे : को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांटचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील कार्यक्रमात ‘को-जन इंडिया’चे संस्थापक, खा. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी को-जन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश जगदाळे, नरेंद्र मोहन, सुभाष कुमार व जनरल मॅनेजर संजय खताळ आदी उपस्थित होते.
व्यासपीठावर राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ऑइल अॅड नॅचरल गॅस कॉपोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुभाष कुमार, डी. डी. जगदाळे, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, हायड्रोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. एस. एस. व्ही. रामकुमार आणि रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत गेल्या चार दशकांपासून सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राहू (दौंड) जवळ त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन श्रीनाथ म्हस्कोबा हा खासगी साखर कारखाना २००४ साली सुरू केला. कमी खर्चात, उत्तमपणे कारखाना कसा चालवता येतो याचा आदर्श त्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांच्या माध्यमातून उभा केला आहे. ‘को-जन’ पुरस्काराच्या माध्यमातून कारखान्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.