पुणे : निरा खोऱ्यातील साखर कारखाने 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना केली.निरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पडलेल्या कमी पावसाने नद्यांचे पाणी आटले आहे. दुष्काळी स्थिती असून विहिरी, कूपनलिका आदींची पाणीपातळी घटली असून, याचा ऊस पिकावर परिणाम होईल. या परिस्थितीचा विचार राज्य शासनाने करावा, असे तावरे यांनी सांगितले.
तावरे म्हणाले की, निरा खोऱ्यात हजारो एकर ऊस क्षेत्र आहे. या खोन्यातील धरणक्षेत्रात पाऊस कमी पडल्याने दिवसेंदिवस धरणातील पाण्याचा साठा कमी होत आहे, तर नद्यांचे पाणी वाहताना दिसत नाही. घटलेल्या पर्जन्यमानामुळे आटलेल्या विहिरी आणि कूपनलिका पाहता ऊस जगवायचा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शासनाच्या धोरणानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये साखर कारखानदारीचा गाळप हंगाम सुरू होतो मात्र, प्राप्त परिस्थितीचा विचार करता धरणक्षेत्रातील घटलेली पाणीपातळी आणि त्यामुळे उशिरा मिळणारे पाण्याचे आवर्तन भविष्यात मिळेल, याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे आडसाली लागणीचे ऊस आणि उभे ऊस टिकवायचे असतील, तर गाळप हंगाम शासनाने 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे मत तावरे यांनी व्यक्त केले.
ऑक्टोबरमध्ये कारखानदारी सुरू केली, तरी कमी मिळणारी साखरेची रिकव्हरी आणि काही प्रमाणात घटणारे टनेज, यामुळे ऊस उत्पादकांना थोडे नुकसान सोसावे लागेल, परंतु जर उशिरा साखर कारखानदारी सुरू केली, तर मात्र मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घटणार आहे. वाळलेला आणि वाढे नसलेला ऊस तोडण्यास तोडणी कामगारदेखील नकार देण्याची शक्यता आहे. अशावेळी ऊस उत्पादक शेतकन्यांवर दुहेरी संकट येईल. जर साखर कारखाने लवकर सुरू केले तर पुढील काळात पाण्याचे आवर्तनदेखील वाचून उपलब्ध पाण्याचा योग्य विनिमय करता येईल, असे मत तावरे यांनी व्यक्त केले.