कोल्हापूर : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांट’ पुरस्कार ‘को-जन इंडिया’चे संस्थापक, खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ व सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी कारखान्याच्या मागील तीन हंगामामधील तांत्रिक कार्यक्षमतेचे परीक्षण झाले आहे. पुणे येथील कार्यक्रमात खा. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला.
कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ म्हणाले, २०२२-२३ या गळीत हंगामामध्ये कारखान्याने एकूण दहा कोटी ८१ लाख ७१ हजार २७० युनिट वीजनिर्मिती केली. त्यापैकी दोन कोटी ९१ लाख ३९ हजार २७० युनिट वीज कारखान्यासाठी वापरली. महावितरणला सात कोटी ९० लाख ३२ हजार युनिट वीज निर्यात केली. त्यापोटी महावितरणकडून ५३ कोटी ४३ लाख रुपये कारखान्याला मिळाले. पारितोषिक वितरण कार्यक्रमास अध्यक्ष नविद मुश्रीफ, जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, मिलिंद पंडे, नामदेव भोसले. बी. ए. पाटील, भूषण हिरेमठ आदी उपस्थित होते.