नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. किसान लोन पोर्टल असे याचे नाव आहे. हे पोर्टल अनेक सरकारी विभागांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे आणि किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत क्रेडिट सेवा या अंतर्गत दिल्या जाणार आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांचा डेटा, कर्ज वाटपाची माहिती, व्याज सवलत आणि योजनेच्या प्रगतीची माहिती मिळेल.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केसीसी कर्ज खातेधारकांशी संबंधित माहिती आता किसान कर्ज पोर्टलवर सर्वसमावेशक स्वरूपात उपलब्ध होईल. ही सुविधा पूर्वी नव्हती. यासोबतच सर्व खातेधारकांची पडताळणी आधारद्वारे केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास मदत होणार आहे. या पोर्टलद्वारे व्याज सवलतीचे दावे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची योजना आहे. त्याचबरोबर, या पोर्टलद्वारे योजनेचे लाभार्थी आणि थकबाकीदार शेतकऱ्यांचे मूल्यमापन सरकारला करता येणार आहे. यासोबतच ‘घरोघरी केसीसी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. भारतातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी ही एक महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज सुविधांचा अखंड लाभ मिळावा, जेणेकरून त्यांची शेतीची कामे सुरळीतपणे पार पाडता येतील असा याचा उद्देश आहे.
सद्यस्थितीत ३० मार्च २०२३ पर्यंत सुमारे ७.३५ कोटी केसीसी खाती आहेत. त्यांची एकूण मंजूर रक्कम ८.८५ लाख कोटी रुपये आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात एप्रिल-ऑगस्ट दरम्यान सवलतीच्या व्याजदरावर ६,५७३.५० कोटी रुपयांची कृषी कर्जे वितरित केली आहेत.