गोसाईगंज : किसान सहकारी साखर कारखाना नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. पुन्हा एकदा मोडकळीस आलेली कारखान्याची यंत्रसामुग्री ऊस गाळपात अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे दावे केले जात असले तरी त्य्हाम्ध्ये फार सुधारणा झाली नसल्याचे दिसते. साखर कारखान्याचे आधुनिकीकरण करण्याचे सरकारचे आश्वासन केवळ कागदोपत्रीच राहिले आहे. प्रशासन कारखान्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या एक वर्षापासून निधीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे कारखान्यावरील कर्जाचा बोजा दरवर्षी वाढत आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किसान सहकारी साखर कारखान्यावर सन २०२३-२४ मध्ये एकूण कर्ज ६ अब्ज १८ कोटी २ लाख ५५ हजार रुपये आहे. यावर्षी कर्जात ५२ कोटी ९० लाखांची वाढ झाली आहे. साखर कारखान्याला वर्षाला ३० कोटी ६९ लाख २२ हजार रुपये व्याज म्हणून द्यावे लागत आहेत. जीर्ण मशीनरीमुळे कारखान्याला उद्दिष्टानुसार गाळप करता येत नाही. २०२०-२१ मध्ये साडेआठ लाख क्विंटलच्या तुलनेत पाच लाख ७६ हजार क्विंटल गाळप करण्यात आले. २०२१-२२ मध्ये साडेआठ लाख क्विंटल गाळपाचे उद्दिष्ट असताना सात लाख क्विंटल झाले. तर गेल्यावर्षी दहा लाख क्विंटलच्या तुलनेत कसेबसे ८.८६ लाख क्विंटल गाळप होऊ शकले आहे.
यंदाच्या हंगामात १० लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी जास्त उसाची लागवड केली आहे. सीसीओ राधेश्याम पासवान यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३,३३४ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. कारखान्याने ३० जून रोजी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी नाही.