शामली : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडून उसाची बिले देण्यास टाळाटाळ सुरू आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ४९.८२ टक्के बिले मिळाली आहेत. शामली, थानाभवन आणि ऊन या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे अद्याप तब्बल ५६५.७१ कोटी रुपये थकीत आहेत. याप्रश्नी बुधवारी जलालपूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी दिन कार्यक्रमादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. आगामी गळीत हंगामात कोणत्याही परिस्थितीत शामली साखर कारखान्याला ऊस देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला.
‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शामली कारखान्याकडे शेतकऱ्यांचे २४१.७८ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याने फक्त ३०.५६ टक्के बिले दिली आहेत. थानाभवन कारखान्याकडे २१९.५४ कोटी रुपये तर ऊन कारखान्याकडे सुमारे १०४.४० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी नेते कुलदीप पनवार, युवा नेते राजन जावळा, आशिष चौधरी, विदेश मलिक, कपिल खतियान आदींनी उसाची थकीत बिले देण्याची मागणी करत गोंधळ घातला. ऊसाची थकबाकी न दिल्यास आगामी गळीत हंगामात शामली व इतर दोन कारखान्यांना ऊस पुरवठा करणार नाही असे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या कारखान्यांची ऊस खरेदी केंद्रे कमी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. थकबाकी लवकर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यादरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र सिंह यांनी जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंग यांना आगामी गळीत हंगामापूर्वी उसाची थकीत बिले देण्याच्या सूचना दिल्या. शेतकरी दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. संदीप चौधरी यांनी नैसर्गिक शेतीबाबत माहिती दिली. कृषी उपसंचालक प्रदीपकुमार यादव, जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंग, जिल्हा कृषी संरक्षण अधिकारी अमित कुमार उपस्थित होते.