गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केन्द्र सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) खुल्या बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत साप्ताहिक ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करत आहे. गव्हाच्या सध्याच्या हमीभावाच्या दराने म्हणजेच 2125/- प्रति क्विंटल या राखीव दराने केन्द्राने गहू उपलब्ध केला आहे.
देशभरातील 480 हून अधिक गोदामातून प्रत्येक साप्ताहिक लिलावात 2.00 लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध केला जात आहे. 2023-24 या वर्षात 21.09.2023 पर्यंत एकूण 13 ई-लिलाव झाले आहेत. यात 18.09 लाख मेट्रिक टन गव्हाची या योजने अंतर्गत विक्री झाली आहे.
ऑगस्ट 23 मध्ये गव्हाची सरासरी विक्री किंमत 2254.71 रुपये प्रति क्विंटल होती. 20.09.23 च्या ई-लिलावात ती कमी होऊन 2163.47 रुपये प्रति क्विंटल झाली. खुल्या बाजारात गव्हाचे बाजारभाव थंडावल्याचे गव्हाच्या सरासरी विक्री किमतीतील घसरणीचा कल सूचित करतो. प्रत्येक साप्ताहिक ई-लिलावात, उपलब्ध केलेल्या गव्हाच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण 90% च्या पुढे नाही. देशभरात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे याचेच हे निदर्शक आहे.
ओएमएसएस (डी) धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे खुल्या बाजारात गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या गेल्या आहेत. 2023-24 च्या उर्वरित कालावधीसाठी ओएमएसएस (डी) धोरण चालू ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.