चंदगड : अथर्व -दौलत साखर कारखान्यातील मशिनरींचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गाळप क्षमता वाढून उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. या कंपनीने घेतलेल्या दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन शुक्रवार (दि. २१ ) कारखान्याचे इलेक्ट्रिक मॅनेजर विठ्ठल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खोराटे बोलत होते. कारखाना यंदा सात लाख टन उसाचे गाळप करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्ष मानसिंग खोराटे म्हणाले की, अथर्व कंपनीने गेल्या चार हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले दिली आहेत. याशिवाय तोडणी ओढणी वाहतूक कंत्राटदारांची बिले वेळेत देवून अथर्व व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यावर्षी ७ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. यावेळी संचालक विजय पाटील, महेश कोनापुरे, नरेश रामपुरे, युवराज पाटील, शशिकांत सूर्यवंशी, जयवंत साठे, सुनील शिंदे, विशाल पाटील, स्वरूप पाटील, आबासो देसाई यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारखाना कार्यस्थळावर तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले.