सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने उसाला जिल्ह्यात सर्वाधिक प्रति टनास २७५१ रुपये दर जाहीर केल्याचे प्रतिपादन चेअरमन प्रशांत परिचारक यांनी केले. पांडुरंग कारखान्याच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, कारखान्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळवला आहे. कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेअरमन परिचारक म्हणाले की, कारखान्याची एफआरपी प्रती टन २,६९४ रुपये आहे. कारखान्याने आतापर्यंत २,६०० रुपये दिले आहे. एफआरपीचे ९४ रुपये देणे बाकी आहे. त्यापेक्षा अधिक १५५ रुपये ज्यादा देण्याचा निर्णय कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करण्यात आला आहे. सभासदांना सर्वाधिक २,७५१ रुपये प्रती टन मिळणार आहे. दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जातील.
सर्वसाधारण सभेत कारखान्याचे ऊस भूषण आणि आदर्श शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुंडलिक मोरे यांना पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शकुंतला रोंगे, माणिक भोसले, रामचंद्र जाधव, राहुल सावंत, हिंमत खुळे, नारायण चौगुले यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी विषयांचे वाचन केले. माजी चेअरमन दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, उमेश परिचारक, दिलीप चव्हाण, पंढरपूर बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे आदी उपस्थित होते.