सोनहिरा कारखान्याच्यावतीने आठ शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कार जाहीर

कडेगाव : सोनहिरा कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील आठ शेतकऱ्यांना डॉ. पतंगराव कदम ऊसभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांनी ही माहिती दिली. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची या पु्रस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या पुरस्करांचे वितरण करण्यात येणार आहे.

सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष जालिंदर महाडिक, संचालक रघुनाथराव कदम उपस्थित होते. मोहनराव कदम म्हणाले की, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढावे या उद्देशाने माजी राज्यमंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून ऊस पीक स्पर्धा आयोजित केली आहे. संस्थापक दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे नावाने हा पुरस्कार कारखान्यामार्फत दिला जातो.

ज्यांचे ऊस टनेज एकरी सर्वाधिक आले आहे, तसेच पुरस्काराच्या अनुषंगाने सर्व अटींचे पालन केले आहे, अशा शेतकऱ्यांना डॉ. पतंगराव कदम ऊसभूषण पुरस्कार, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. आडसाली हंगामासाठी स्वाती योगेश घार्गे (उपाळे मायणी), शहाजी रामचंद्र मोकळे (वांगी), बापूराव विष्णू पोळ (सासपडे) यांची निवड झाली आहे. पूर्व हंगामासाठी माणिक तुकाराम माने, (आंधळी). सुरू हंगामासाठी रामदास बाबूराव पोळ (सासपडे), खोडवा पिकासाठी भारती भीमराव यमगर (वांगी), छाया हिम्मतराव शिंदे (रामापूर), अनिल सदाशिव लाड (बांबवडे) यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here