अहमदनगर : थोरात कारखान्याकडून नेहमीच शेतकरी आणि परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कारखान्यातर्फे उसाला प्रति टन २८३५ रुपये भाव दिला जाणार असल्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले. ते म्हणाले, एकरी उत्पादन वाढल्यास उसाला जास्त भाव मिळेल. त्यासाठी एकरी १०० टन उस उत्पादन होणे गरजेचे आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार थोरात बोलत होते. अध्यक्ष प्रतापराव ओहोळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी दुर्गाताई तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सभासद, ऊस उत्पादक व संचालक उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, यंदा कारखान्याने १० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ६ कोटी २२ लाख युनिट वीज, अल्कोहोल व विविध खतांची निर्मिती केली. सीएनजी पेट्रोल पंप सुरू केला. आता ग्रीन हायड्रोजन प्रकल्प येतो आहे. डॉ. तांबे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी थोरात कारखान्यातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले.