‘निसाका’च्या कामगारांचे थकीत वेतनासाठी प्रवेशद्वारावर गांधीगिरी आंदोलन

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने अवघ्या नऊ महिन्यांत कारखान्याला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे साडेचारशे कामगार हवालदिल झाले आहेत. कामगारांच्या थकीत तीन महिन्यांच्या वेतनापैकी दोन महिन्यांचे वेतन गुरुवारी कामगारांना अदा करण्यात आले. सोमवारपासून कामावर न येण्यासंदर्भात नोटीस लावली. त्यानंतर सोमवारी कामगारांनी गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन करून कारखान्याच्या गेटसमोरच द्वारसभा घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला.

निफाड सहकारी साखर कारखाना २४ डिसेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. मात्र, कारखान्याला आता कुलूप ठोकण्यात आले. गेल्या तीन महिन्यापासूनचे ४०० ते ४५० कामगारांचे वेतन थकीत आहे. कामगारांकडे कामावर येण्यासाठी देखील पैसे नव्हते. कामगारांनी आठवड्यात वेतन देण्याची मागणी केली. दोन महिन्यांचे वेतन मिळाल्याशिवाय कामावर हजर होणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला. मात्र, कारखाना व्यवस्थापन अर्धा किंवा एक पगार देण्यावर ठाम होते. गुरुवारी कारखाना व्यवस्थापनाने दोन महिन्यांचे थकीत वेतन अदा केले. मात्र, कामगार युनियन कार्यालयाच्या फलकावर शुक्रवारपासून कामावर येऊ नये, अशी नोटीस लावण्यात आली होती. त्यामुळे कामगारांनी सोमवारी कामगारांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. आता साखळी उपोषण, बेमुदत उपोषण व बँकेविरुद्ध मूकमोर्चा काढण्याचा इशारा द्वार सभेत देण्यात आला.

कामगार युनियनचे सरचिटणीस बी. जी. पाटील म्हणाले की, जिल्हा बँक कामगारांच्या देणी देण्यास टाळाटाळ करीत आहे. साखर आयुक्त, कामगार आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक, अवसायक निसाका व अन्य शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला आहे. आता गांधीगिरी मार्गाने बेमुदत आंदोलन करत आहोत.

दरम्यान, कारखाना २०१३ मध्ये बंद करण्यात आला होता. एकूण ८९.४९ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. मात्र, १,०७६ कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे असा आरोप कामगारांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here