पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतील अहवालात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत मधुकरराव शितोळे यांचा फोटो प्रसिद्ध केला नसल्याने पाटस (ता. दौंड) येथे सभासदांनी कारखान्याचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाचा निषेध करण्यात आला. सभासदांनी सर्वसाधारण सभेच्या अहवालाची होळी केली.
भीमा पाटस साखर कारखान्याची उभारणी दिवंगत मधुकरराव शितोळे यांनी केली आहे. मात्र, संचालक मंडळाने जाणीवपूर्वक अहवालात दिवंगत शितोळे यांचा फोटो प्रसिद्ध केलेला नाही. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. कारखान्याने अहवाल पुन्हा नव्याने छापून त्यात दिवंगत मधुकरराव शितोळे यांचा फोटो आणि नाव छापावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी सरपंच रंजना पोळेकर, उपसरपंच राजवर्धन शितोळे, माजी सरपंच अवंतिका शितोळे, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे, शिवाजी ढमाले, माणिकराव भागवत, संभाजी चव्हाण, सागर शितोळे आदी आंदोलनात सहभागी होते.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष राहुल कूल म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत मधुकरराव शितोळे यांच्या विषयी आदर कायम आहे. मात्र, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या अहवालात गेल्या तीन वर्षांपासून कोणाचेही फोटो छापले जात नाहीत. त्यामुळे या वर्षीही ते प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.