वारणानगर : वारणा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रती टन याप्रमाणे दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केली. स्वाभिमानी संघटनेने मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकारी व्ही. एस. कोल्हे यांच्याकडे दिले.जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले, माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा ५६० रुपये जादा दर दिला आहे. त्याप्रमाणे वारणा कारखान्यानेही दर द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत एकरकमी एफआरपी द्या व गळीत हंगाम संपल्यानंतर हिशेब करून दुसरा हप्ता शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी केली होती. सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली असली तरी हंगाम संपल्यावर कोणीही हिशेब केलेला नाही. कारखान्यांनी दुसरा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना ४०० रुपये न दिल्यास आंदोलन करू. यावेळी पन्हाळा तालुकाध्यक्ष अजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, संपत पवार, अण्णा मगदूम, सुनील मगदूम, सुनील सूर्यवंशी, राजू मालगावे, विवेक बच्चे, विजय सावंत, प्रवीण घोरपडे, बंडा पाटील, राहुल पाटील, संभाजी पाटील, विलास पाटील आदी उपस्थित होते.