सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील १० गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याचा निर्णय रद्द

माळेगाव : सभासद आणि शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे सोमेश्वर कारखाना हद्दीतील १० गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सभासदांच्या तीव्र भावना लक्षात घेवून हा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष केशवराव जगताप व उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्या संचालक मंडळाने १० गावे माळेगाव साखर कारखान्याला जोडली जाणार नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिल्याने या चर्चेवर पडदा पडला आहे.

गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी माळेगाव कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याच्या हद्दीतील दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यासाठीचा प्रस्ताव तत्कालीन चेअरमन बाळासाहेब तावरे यांनी सभासदांपुढे मांडला. मात्र, या प्रस्तावाला सभेत प्रचंड विरोध झाला होता. विरोधक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी प्रतिसभा घेत १० गावे माळेगावला जोडण्यास विरोध केला होता.

याबाबात, अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, सभासदांचा विरोध लक्षात घेत १० गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यासाठीचा प्रस्ताव संचालक मंडळाने नामंजूर करण्याचा ठराव केला आहे. वार्षिक सभेत शासनाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनीही दहा गावे माळेगावला जोडली जाऊ नयेत, असा वस्तुनिष्ठ प्रस्ताव शासनास व साखर आयुक्तांना लेखी स्वरुपात दिला होता. सत्ताधारी संचालक मंडळाने हरतऱ्हेने प्रयत्न केला. ही १० गावे माळेगाव साखर कारखान्याला जोडलीच पाहिजेत, यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या; परंतु सभासदांचा विरोध कायम राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here