कोल्हापूर : यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम दोन्ही राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उसाअभावी साखर कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने चालविणे जिकीरीचे होणार आहे. त्यातच कर्नाटकातील साखर कारखाने लवकर सुरु होण्याच्या शक्यतेने महाराष्ट्राच्या कोल्हापूरसह सिमाभागातील साखर कारखानदार धास्तावले होते. मात्र आता कर्नाटक सरकारने सीमाभागातील साखर कारखान्यांचा हंगाम एक नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकाचवेळी कारखाने सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातून होणाऱ्या उसाच्या संभाव्य पळवापळवीला लगाम बसणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ऊस बेळगाव, विजापूर, इंडी आदी भागात पाठवला जातो. यंदा, राज्यातील ऊस उत्पादनात बारा ते पंधरा टक्के घट होण्याचा अंदाज या अगोदरच ‘चीनी मंडी’ने व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर कारखान्यांना ऊस टंचाई निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकार तर्फे परराज्यात ऊस निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे चार दिवसातच ही बंदी मागे घेण्यात आली. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याकडून उसाची लवकर उचल केली जाते. यावर्षी तसे झाल्यास अडचण निर्माण झाली असतील. मात्र, आता कर्नाटक सरकारने राज्यातील कारखाने एक नोव्हेंबरनंतर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.