प्रति टन पाच हजार रुपये दर देणाऱ्या कारखान्यालाच ऊस देणार : शेतकऱ्यांचा निर्धार

बीड : गेल्यावर्षी उसाला बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी २००० ते २५०० रुपये प्रती टन एवढाच दर दिला. तुटपुंज्या बिलाने काही होत नाही. या वर्षी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रति टन पाच हजार रुपये दर ठरवला जाणार आहे. पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त भाव देईल त्याच कारखान्याला ऊस देण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला. परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांविरुद्ध आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. आंदोलनाची सुरुवात सिरसाळ्यातून होणार आहे.

यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे उसाचा उतारा हा निम्म्यावर किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकतो. उसाच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती प्रत्येक कारखान्याच्या प्रमुखांना भेटून उसाच्या दराबाबत चर्चा करेल. सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर साखर आयुक्तांना भेटून दराविषयी चर्चा केली जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संघर्ष समिती स्थापन झाली की पुढची दिशा ठरविण्यासाठी संघर्ष समितीचा पहिला मेळावा हा सिरसाळा येथे होईल असे बैठकीत सांगण्यात आले.

भाजपचे उत्तम माने, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, माजी जिल्हा परिषद सभापती प्रभाकर वाघमोडे, माजी बाजार समिती सभापती बाळासाहेब काळे, अच्युत गंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड, ममदापूर, रामवाडी, जळगहवन, हिवरा, गोवर्धन, पौळ पिंपरी, पिंपळगाव गाडे, सिरसाळा आदी गावातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here