धाराशिव : कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरला उपपदार्थांच्या माध्यमातून चालू आर्थिक अहवाल वर्षात साखर व स्टील विभागातील तोटा भरून काढून ७६.२९ कोटी रूपये नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात २५ टक्के लाभांशची घोषणा नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली.
कारखाना परिसरात २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ठोंबरे म्हणाले की, दुष्टचक्रात सापडलेला मराठवाड्यातील साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने करून दाखवले आहे. विक्रमी गाळप करूनही साखर उत्पादन तोटयात होते. मात्र, नॅचरल शुगरने साखर निर्मिती बरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून कारखाना नफ्यात आणला आहे. साखर कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीशिवाय पर्याय नसल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. प्रास्ताविक संचालक पांडुरंग आवाड यांनी केले. आभार संभाजी रेड्डी मानले.