पुणे : भीमाशंकर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर यंदापासून इथेनॉल प्रकल्प कार्यानिव्त होणार आहे. २०२२-२३ हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटनास एफआरपीप्रमाणे २७५० रुपये दिले आहेत. आता अंतिम हप्ता ३५० रुपये, असा एकूण अंतिम दर प्रति टन ३१०० रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची २०२२-२३ ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मंत्री वळसे-पाटील बोलत होते.
मंत्री वळसे- पाटील म्हणाले, भीमाशंकर कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमता चार हजार टनावरून सहा हजार टन केली आहे. सुरवातीला सहा मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प सुरु केला. त्यानंतर नवीन १३ मेगावॉट वीज प्रकल्प उभारला. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त दर देणे शक्य झाले. १३७ कोटी रुपये खर्च करून उभारलेला इथेनॉल प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील सोमेश्वर व माळेगाव कारखान्याने दिलेल्या दराबाबत तुलना करत असताना ते कारखाने सभासद व गेटकेनच्या ऊस दराबाबत फरक करतात, मात्र भीमाशंकर पहिल्यापासून सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील उसाबाबत भेदभाव न करता सारखाच बाजारभाव देत आहे. इथेनॉल प्रकल्प सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनातील बाजारभाव दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, किरणताई वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे व संचालक उपस्थित होते.