बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याचे आदेश कर्नाटकच्या व्यापार व औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. रिचर्ड डिसोजा यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांना दिले आहेत. यंदा पावसाअभावी उसाचे उत्पादन कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे उत्तर भागात निर्धारित मुदतीपूर्वी हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईच्या सूचनाही सचिवांनी दिल्या आहेत.
८ जुलै रोजी कर्नाटकच्या मंत्री समितीची बैठक झाली. यामध्ये याविषयी सूचना देण्यात आली आहे. ११ ऑगस्ट रोजी राज्याच्या साखर आयुक्तांनी पत्र पाठवून उत्तर कर्नाटकमधील साखर कारखान्यांना याविषयी सूचना दिल्या. १२ सप्टेंबर व १३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही याविषयी चर्चा झाली. कर्नाटक राज्यात दरवर्षी साखर कारखाने आपल्या मर्जीनुसार गळीतास सुरुवात करतात. उत्तर कर्नाटकमध्ये नोव्हेंबरपूर्वी कारखाने सुरू करण्याची प्रथा आहे. ऊस नेण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा असते. परिणामी पक्व न झालेला ऊस गाळप केला जातो. त्याचा परिणाम साखर उताऱ्यासह उप पदार्थांवर होतो.
कारखाने लवकर सुरू झाल्यास, त्यांच्याकडून इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस अनाधिकृतपणे व बेकायदा गाळप केला जातो. उसाची पळवापळवी होते. यातून वाद तसेच कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याचा विचार करून १ ते १५ नोव्हेंबर या काळात कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावा असे व्यापार व औद्योगिक विभागाच्या सचिवांच्या आदेशात म्हटले आहे. उत्तर कर्नाटकातील साखर कारखाने एक नोव्हेंबरपूर्वी सुरू झाल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी, असे डॉ. डिसोजा यांनी पत्रात म्हटले आहे.